'सेल्फी'चे संस्कृतनिष्ठ भाषांतर करता येईल 'स्वयंचित्र'. पण हा शब्द फारच मोठा आहे नाही? शिवाय 'कूल'सुद्धा वाटत नाही हा! मग काय करुयात? 'स्वयंचित्र' हा शब्द 'स्वयम्' आणि 'चित्र' असा दोन शब्दांचा बनलाय ना! त्या दोन्हीही शब्दांची सुरुवातीची अक्षरे 'स्व' आणि 'चि' घेऊन नवीन शब्द बनवूयात, 'स्वचि'!! वाटतो की नाही, 'कूल'!! तेव्हा 'सेल्फी' ह्या प्रत्यक्षातल्या लघुकारी शब्दासाठी मी एक पूर्णतः नवा आणि तसाच एक लघूकारी शब्द देतोय, 'स्वचि'!!
आता कुणाला वाटेल की, मी संस्कृतच्या व्याकरणनियमांचा भंग केलाय. हा आक्षेप पूर्णपणे मान्य असेल मला. पण अहो, काहीतरी नवीन निर्माण करायचं म्हटलं की एखाद-दुसरा नियम तुटणारच! जुने नियम तुटक नाहीत, तोपर्यंत काहीतरी नवे कसे बनणार? फक्त नियम तोडून काही नवे बनवताना ते भाषेला समृद्ध करणारे असले म्हणजे झाले! कुणी सांगावे, आपल्या माहितीपलिकडे असे लघुरुप बनवणारा संस्कृतमध्ये एखादा नियम असूही शकेल. आणि समजा नसला, तरीही 'स्वचि'ची उपयोगिता पाहाता, इथे अपवाद करायला हरकत नाही. शेवटी अपवादानेच तर नियम सिद्ध होतो ना!
आणि एक गंमत सांगू? आपण छायाचित्र काढताना उगाचच हसरे दिसण्यासाठी इंग्रजीत म्हणतो, 'से चीऽऽज्'!! काय अर्थ आहे याला? शून्य!! यांच्यापैकी बरेच जण 'चीज' खातसुद्धा नसतील!! त्याऐवजी आपण 'स्वचि' काढताना मस्तपैकी संस्कृतात म्हणू शकतो, 'स्वचिऽऽ'!! परिणाम तोच, परंतु शब्द मात्र संस्कृतोद्भव!! आहे की नाही मज्जा? तेव्हा आता होऊन जाऊ द्या हवे तितके 'सेल्फी', नाही नाही.. 'स्वचि'!!
Comments
Post a Comment